उबन्टू १०.०४ :: टाका रे !

जानेवारीनंतर उबन्टू लिनक्स वापरण्याचा केलेला प्रयत्न चांगलाच यशस्वी झालाय. गेल्या पाच महिन्यात मी विन्डोज केवळ गुगल व्हिडिओ चॅटसाठी वापरल. त्याशिवाय वापरण्याची‌ कधी‌ गरज पडली‌ नाही‌ किंवा वेळही‌आली नाही. गेले काही दिवस उबन्टू १०.०४ ची चर्चा ऐकून काल एकदाच ट्रायल म्हणून हार्डडिस्कवर एका बाजूला उबन्टू १०.०४ टाकलं, फर्स्ट इंप्रेशन तर जबरदस्त आहे. मला आवडलेल्या गोष्टींची ठळक यादी देतोय, सोबत माझा ताजा डेस्कटॉप स्क्रीन जोडला आहे :

My Ubuntu 10.04 desktop

My Ubuntu 10.04 desktop

१. इन्स्टॉल करताना हार्डडिस्कवर असलेल्या विन्डोज आणि उबन्टू ९.१० मधून डॉक्युमेन्ट्स आणि सेटींग इम्पोर्ट करायची सोय.

२. बिल्ट-इन सोशल नेटवर्किंग टूल, एकाच वेळी‌ ट्विटर, फेसबुक आदी अनेक साईटवर एका क्लिकमधे मेसेज टाकता येतो.

३. आयबस डिफॉल्ट इन्स्टॉल्ट होते, यात मराठी टायपिंगसाठी तिनही पर्याय उपलब्ध आहेत.

४. डेलबरोबर ब्राईटनेस कंट्रोल प्लगिन टकाटक चालतय. सुमारे एक मिनट इनाऍक्टीव्ह असल्यास ब्राईटनेस डिम होतो, हे फिचर उबन्टूवर प्रथमच पाहतोय, यापूर्वी मॅकवर पाहिलं होतं.

५. युआय एकदम ढासू आहे हे सांगायला नकोच, सोबत जर कैरो डॉकबार इन्स्टॉल केला तर आनंदच.

६. उबन्टू ९.१० ची थिम मला आवडली होती, ती यावेळी‌ का उपल्ब्ध नाही , ते माहित नाही. तसच बूट-लोडर अजूनही कृष्ण-धवलच आहे, तो मला कष्टाने बदलता येतो पण उबन्टू‌ इन्स्टॉलर त्याला कधी‌ कधी‌ बदलणार ?

७. नविन मशिनवर आलेली ‘gbrainy’ मधे एकदम चकाट्या कोडी‌ आहे, काल बसल्याबसल्या तासदिडतास कसा गेला ते कळल नाही. शकुंतलादेवींच्या पझल्स-टू-पझल-यू ची आठवण झाली.

८. गुगल व्हाईस चॅट व्यवस्थित चालताय बोलतय !

९. याच मशिनवर विन्डोज ७ पेक्शा बूट टाईम जवळजवळ २/३ कमी लागतो. :)

नैराश्य :: माझा पर्सनल डिझास्टर रिकव्हरी प्लॅन

डिझास्टर मॅनेजमेन्ट हा कोणत्याही व्यवसायाचा अविभाज्य घटक झालेला आहे, त्या अनुषंगाने कंपन्यांच्या डिझास्टर मॅनेजमेन्ट पॉलिसीज देखील असतात, यामधे भूकंप, आग आदी‌ संकट आल्यास कंपनीचे नुकसान कसे टाळता येईल व व्यवसाय कसा सुरू राहिल अशी मार्गदर्शक तत्व असतात व त्यानुसार संकटातदेखील तग धरता येते. जर कंपनीचा असा प्लॅन असतो तर आपल्या स्वत:साठी का नाही ? मनाला जेव्हा प्रचंड खिन्नता वाटते, निराशेचं काहूर माजतं त्यावेळी‌ काय करायचं हे कुठेतरी लिहिलं पाहिजे ना आणि हे ठरवणारा स्वत:पेक्शा जास्त चांगला कोण असेल ?

डिजास्टर

डिजास्टर

मागिल आठवड्यात काही मानसिक संकटांमधून जात असताना Dale Carnegie चा keep yourself busy in something हा नियम आठवला आणि स्वत:ला आवडत्या कामात झोकून दिलं .. माईन्ड मॅपिंगच्या, मी काही तास या कामात व्यस्त होतो बरच मंथन झालं, सरते शेवटी माझ्यासारखा आनंदी मीच होतो कारण तयार झालेलं आऊटपुट पण तसच होतं, त्यानंतर ‘प्लॅन’नुसार आईला फोन केला, तिच्याशी बोललो. त्यावेळी तयार झालेला माईन्ड मॅप इथे देतोय – माझा Personal disaster recovery plan !

चित्राच्या अनुषंगाने तुमचा स्वत:चा प्लॅन बनवताना खालील मुद्दे कदाचित उपयोगी पडतील,

१. ऍसेटस
सर्वात महत्वाची नोड. यात सगळे +ve पॉइन्टस लिहिले आहेत. स्वत:च्या भन्नाट क्वालिटीज. यातील मुद्यांचं वर्गिकरण अनेक अंगानी करता येईल, पण विशेष वाटणारे लिहिलेत. जेव्हा आपण निराश होतो तेव्हा बहुतेक हे सगळे मुद्दे विसरले जातात आणि केवळ आपल्यातील ‘न्यून’ मनावर ताबा घेते, त्यावेळी हे सगळं आठवावं म्हणून लिहलं.

२. मेगा-गोल्स
स्थल-काल याचा प्रभाव नसलेले माझे महा-गोल्स यात लिहिले. जेव्हा जेव्हा एखादी चुकीची वाटणारी, खिन्नता देणारी घटना घडेल त्यावेळी तिचं‌ मुल्यमापन करताना याचा वापर मला होईल. म्हणजे ती घटना जर ‘या’ गोल्सना अडथळा करत नसेल तर नाराज व्हायच कारण नाही, हो ना ? कारण मेगा-गोलच्या तुलनेत ती फारच छोटी गोष्ट असेल, तुमचे मेगा गोल्स काय आहेत ?

३. प्रोजेक्टस
यामधे नोकरीवरच्या प्रोजेक्टपासून मनात असलेल्या सगळ्या प्रोजेक्टसची यादी‌ केली, अगदी घर स्वच्छ करण्यापर्यंत. कारण ‘डिप्रेस’ वाटत असताना नक्की करायचे काय हे सुचत नाही, त्यामुळे ही यादी पाहून कामाला लागता येईल. तसंच जर ऑफिसमधील तणावामुळे निराश झालो तर नोकरी हा शेवटचा पर्याय नाही, बाकीचं बरच काही करता येईल, हे लक्षात रहावं म्हणून इथे सगळे पर्याय लिहून टाकले.

४. टूल्स
यामधे माझ्या आवडत्या टूल्स/टेक्निकची यादी आहे. यात काही गेम्सदेखील टाकल्या आहेत. कंटाळा आल्यावर काय-काय करता येऊ शकेल हे लिहिता लिहिता माझ्या दैनंदिन वापरातल्या टुल्सचाही यात समावेश झाला, अगदीच काय न सांगण्यासारख्या गोष्टी देखील तिथे लिहून काढल्या.

५. पुस्तकं
‘पुस्तकस्थ गतं विद्या ..’ या सुभाषिताप्रमाणे पुस्तकातलं जर ऐन वेळी आठवलं नाही तर काय उपयोग ? त्यामुळे कंटाळा आला तर एक्साईटींग काय वाचता येईल, जे यापूर्वी आवडलं आणि प्रभावशाली वाटलं त्यांची एक लिस्ट मारली. :)

६. टुडू लिस्ट
कंटाळा येण्याचे काही पॅटर्न असतात. काही ठराविक घटना, व्यक्ती किंवा स्थिती‌ यामुळे त्यांची पुनरावृत्ती होते. कधी वैयक्तित तर कधी‌ प्रोफेशनल लाईफमधे. अशावेळी‌ वेळ कशी‌ मारून न्यायची किंवा आपल्या कोणत्या चुकांमुळे हे होतं आणि त्या कश्या सुधारता येतील हे मुद्दे यात टाकले.

७. नितिमूल्य
मी बऱ्याच वेळा अध्यात्म आणि व्यावसायिक जीवन यांची सांगड घालताना चुकतो, अशा वेळी मला विवेकानंदाची तत्वं सर्वात प्रेरणादायी वाटतात. तसच ‘रॅन्डी पॉश्च’ चं ‘(अर्थार्जनासाठी) काहितरी विकायचच असेल तर सर्वात महत्वाची गोष्ट विक – ते म्हणजे शिक्षण’ , हे वाक्य पटतं. त्यामुळे तोही‌ मुद्दा मी लिहिला आहे. प्रत्येकाच्या जगण्यामधे काही तात्विक आधार असू शकतो, तो लिहायला हरकत नाही.

८. लक्षात ठेव
हा मुद्दा मी इथे शेवट लिहितोय पण माझ्या दृष्टीने सर्वात महत्वाचा. यात मी माझ्या स्व्त:वरच्या मानसिक प्रथोमोपचाराचं सार टाकलं. यातिल ‘डिस्कस’ मधे माझ्या जवळच्या व्यक्तिची नाव लिहिली, ज्यांच्याशी मी बोलल्यावर मला आनंद वाटतो तसचं माझी समस्या सांगितली तर ते ‘मलम’ लावू शकतात. तसंच वाचण्याच्या किंवा ऐकण्याच्या काही नोंदी लिहिल्या, आणि सर्वात महत्वाचं तत्व जे मी हे करताना अनुसरलं ‘कशात तरी व्यस्त’ रहा.

.. शेवटी या सर्वाच्या मध्यभागी माझा एक हसरा फोटो टाकला, कदाचित त्यामुळे मला त्या हसऱ्या दिवसाची आठवण येईल.

दोन दिवसांपूर्वी एका ‘ब्लॉगिणीने’ कंटाळा आलाय म्हणून बझ्झ टाकले होते, तेव्हा ‘कंटाळा आला की काय करायचे’ यावर हा प्रपंच , पण ही असाईनमेन्ट करून बघायला हरकत नाही.

सर्पमाळ ::‌ हजार आठवणींचा फोटो

मागील वेळी भारतातून येताना डिजिटल फोटोंचा अल्बम घेऊन आलो होतो. आज प्रचंड उबग आला म्हणून एक-एक फोटो चाळत बसलो. माझा चेहरा फोटोजनिक नाहिय आणि त्यात कहर म्हणजे मला फ्लॅशपडताना डोळे मिचकायची सवय, त्यामुळे कोणताच फोटो निट येत नाही, या धरतीवर माझ्या लहानपणचा हा फोटो पहाताना मलाच प्रचंड हसू‌ आलं, कारण अल्बम चाळताना बऱ्याच वेळानंतर माझा हसरा फोटो दिसला.

माझा सर्पमाळ असलेला फोटो

माझा सर्पमाळ असलेला फोटो

आता फोटोविषयी थोडसं, माझे आई-वडील ‘सोमेश्वराचे’ चे भक्त, या मंडळीचा असा विश्वास आहे की भगवान शंकर सर्परूपात प्रकट होतात, त्यांच्या त्या सर्परूपातील डोक्यावर विशिष्ट खूण असते, त्या प्रकट झालेल्या ‘देवाला’ पकडून कोणाच्या एका भक्ताच्या घरी नेतात, तिथे दूध पाजतात (?) भजन पूजन होते आणि दोन दिवसांनंतर त्याचे विसर्जन करतात, म्हणजे निर्जन ठिकाणी सोडून देतात. अशाच एका प्रसंगी काढलेला हा फोटो. यातील डोक्यापाठीमागे दाखवलेला चंद्र सोडला तर मी आणि माझ्या गळ्यातील प्राणी दोऩ्हीही खरे आहेत, आणि याच कारणाने आमच्या घरी साप मारत नाहीत. :)

गेल्या १७/१८ वर्षात हा सोहळा कधी अनुभवला नाही, भारतात गेल्यावर जाऊन येण्याच्या ठिकाणांमधे – ‘कडलास’, ‘करंजे’ आणि सोरटी ही क्षेत्र आहेत.

हॅन्डसेट :: मला मदत हवीय !

मला तुमची‌ थोडी मदत हवीय, भारतात वापरण्यासाठी एखादा बरा हॅन्डसेट घेण्य़ाचं खूळ डोक्यात शिरलय. गेली‌ बरीच वर्ष केवळ ऐकणे-बोलणे या सुविधा देणारा सेट वापरल्या नंतर ते कधीतरी‌ बदलावं लागणार हे लक्षात आलंय, तो घेताना असलेल्या गरजा आणि आजच्या गरजा बदल्यामुळे काय घ्याव हा प्रश्न पडला आहे,

माझ्या गरजा :
1. फोन करणे
2. ऑडिओ बुक्स साठवणे – ऐकणे
3. ई-बुक्स साठवणे, वाचणे (pdf आणि इतर)
4. इंटरनेट चाळणे,
5. गुगल मेल, ट्विटर आदी सोयी
6. मराठी वाचणे (लिहिणे असल्यास उत्तम)
7. कॅमेरा
8. Doodling

हे असेल तर उत्तम :
1. ओपन सोर्स / लिनक्स / ऍन्ड्रॉईड वर आधारित असल्यास उत्तम
2. मराठीत लिहिता येणे ( नवीन किमॅप डेव्हलप करण्याची सोय अथ्वा SDK)
3. टचस्क्रीन, किबोर्डशिवाय (यावर तुमचं मत काय आहे ?)

या गरजांवर आधारित htc, nexus one, iPhone .. आणि इतर मॉडेल्स उपलब्ध आहेत, आपल्यापैकी‌ कोणी वापरत असाल तर, मॉडेल, सर्विस प्रोव्हाईडर आदी‌.. अनुभव सांगावा ही विनंती.

लिव्ह इन रिलेशन :: माझा ई-सकाळ वरील लेख

माझा ‘लिव्ह इन रिलेशनशिप – कऱ्हा ते मिसिसीपी‘ हा लेख सकाळच्या वेबसाईटवर पैलतीर या सदरात प्रकाशित झाला आहे. तो वाचण्यासाठी या लिन्कवर टिचकी मारा.