आपली भाषा अस्थिर होतेय, आपल्या भाषेला बाकिचे दुय्यम लेखतायत, आपल्या भाषेची (आणि भाषिकांचीही) गळचेपी होतेय .. असे एक ना अनेक सूर आज आपल्याला ऐकायला मिळतायत, कदाचित तुम्हीही हेच रडगाणं गात असाल. सांखिकीच्या, सामाजिक मान्सशास्त्राच्या, इतिहासाच्या किंवा राजकारणाच्या दृष्टिकोनातून काय सत्य आहे हे पडताळण्याची गरज असेलही, पण एक मात्र नक्की … हे सगळे गळे मराठी बोलणारेच आहेत !
मनातल्या या शंकांवर काल विचार करत असताना एक माईंड मॅप तयार झाला. यातल्या ठळक कारणांवर नजर टाकता येईल :

मराठी
१. भाषिक बाजारपेठ :
जिथे रिटर्न्स , तिथे इन्वेस्टमेंट, हा बदलत्या व्यावसायिक जगाचा पहिला नियम आहे. प्रत्येक उद्योजक त्याचं उत्पादन आणखी कसं विकल जाईल व नफा कसा वाढेल या प्रयत्नात असतो. उत्पादनविक्रीला जे काही अडथळे येतात ते निपटण्याची काळजी घेतली जाते .. मग तो अडथळा भाषेचा का असेना. याचं सर्वात उत्तम उदाहरण म्हणजे युनिकोड अक्षरं पद्धती. विषेशत: युरोपीयन समुदायाचं युरो हे चलन अस्तित्वात आल्यानंतर एकाच वेळी अनेक भाषांमधे संगणन करण्याची प्रकर्षाने गरज भासू लागली व ही समस्या सोडविण्यासाठी अनेक बलाढ्य कंपन्यांनी निधी उभा करून युनिकोड एककांची निर्मिती केली. यात भाषा आणि व्यावसायिकता यांचा मेळ घातला जात असताना महत्वाच्या गोष्टी लक्षात येतात :
१. तेथील स्थानिक भाषांचा वापर – ‘उद्योजक ते उद्योजक (B-B)’ आणि ‘उद्योजक ते उपभोक्ता (B-C)’ या सर्व व्यवहारांमधे होतो.
२. ते काम त्या भाषेत करण्यावाचून अडलं होतं, व त्या अडवणूकीत कंपन्यांचं आर्थिक नुकसान होतं.
३. प्रकल्पातून मोबदल्याची शाश्वती
याच निकषावर आपण आत्मपरिक्षण केले तर पुढील प्रश्न उभे रहातात ..
१. संपुर्ण व्यवहारासाठी केवळ मराठीचा वापर करणारे B-B उद्योजक किती ?
२. किती , कोणत्या व्यवहारामधे मराठी-वाचून अडतय ? ( आपन अडून बसलो ? )
३. व्यावसायिक सेवांच्या मराठीकरणावर ‘रिटर्न ऑन इन्वेस्टमेंट’ किती ?
आणि एक सत्य समोर येते, ते म्हणजे महाराष्ट्रातल सत्ताकारण आणि सहकारी साखर कारखाने याशिवाय असलेल्या व्यवहारी जगातली अर्थसत्ता मराठी भाषेवर अवलंबून नाही, त्यामुळे व्यवहारी जगात मराठी भाषा म्हणून कमी पडते.
२. शैक्षणिक अंधश्रद्धा :
भारतीय मनाला साहेबाच्या रंगाचं आणि बोलीचं भलतच कौतुक. इंग्रजीत बोलणं म्हणजे शहाण्या माणसाचं लक्षण, हा समज गेली दिडशे वर्षात ‘जनुकांमधे’ इतका भिनलाय की आपण हाही विचार करायला विसरलो की – इंग्लंड/अमेरिकेतले वेडे इंग्रजीच बोलत असतील ना ?
केवळ इंग्रजी बोलणं वेगळं आणि स्वत:ची पंचैंद्रिय वापरून, त्याला तारतम्याची जोड देत विचारशक्तीला पणाला लावून कला-ज्ञान-विज्ञानच्या क्षेत्रात भराऱ्या मारणं वेगळं, याच भानच संपलय. याच गैरसमजातून निर्माण झालेली शैक्षणिक अंधश्रद्धा म्हणजे – इंग्रजी शाळांतून मुलांना चांगलं शिक्षण मिळेल. याच अंधश्रद्धेपोटी कित्येक पालक खिशाला न परवडणाऱ्या शाळांमधे मुलांना घालतात. याविषयावर एक वेगळंच ब्रेन-स्टॉर्मिंग होईल, पण जाता जाता काही प्रश्न :
१. तुमची मुलं ज्या शाळेत जातात ती शाळा एखाद्या राजकीय शिक्षण सम्राटाची तर नाही ना ? त्यातले शिक्षक कोणत्या भाषेत शिकले ?
२. मराठी शाळेपेक्शा असं काय जास्त इंग्रजी शाळेत शिकवलं जाईल असं पालकांना वाटतं, जे त्यांना मुलाला शिकवता येणार नाही ?
३. आज देशविदेशात उच्चपदस्थ व्यक्तीची शालेय शिक्षण कोणत्या माध्यमात झाले ?
४. इंग्लंड अमेरिकेत नावाजलेल्या महर्षी स्कूल प्रमाणे भारतातल्या इंग्रजी शाळांत वैदीक गणित, संस्कृत शिकवतात का ? का नाही ?
५. आपला पाल्य (फक्त) इंग्रजी बोलणारा पोपट करायचाय ?
३. भाषेचं राजकारण :
स्वातंत्र्यानंतर काही पक्षांनी त्यांच्या स्वातंत्यपूर्व इतिहासाचं भांडवल केलं आणि सत्ता मिळवली आणि उरलेल्यांनी सत्तेसाठी कारण शोधली.
अपवादात्मक चळवळी पक्ष सोडले तर इतर केवळ शंखच आणि यातला एक महत्वाचा मुद्दा म्हणजे – भाषेचं राजकारण !
१. जर मराठी भाषा ‘वर्ल्ड क्लास’ झाली तर आत्ता भाषेसाठी राजकारण करणारे नंतर काय करतील ? त्यांना खरच असं व्हावं असं वाटत असेल का ?
२. एक पक्ष भाषेचं राजकारण करतो आणि दुसरा पक्ष पहिल्याला नामोहरम करतो .. यात भाषासमृद्धी कशी होणार ?
३. पहिले दोने मुद्दे जर तुम्हाला पटत असतील तर त्याच्या अनुषंगाने खरच राजकारण आहे का ?
४. अ विज्ञान भाषा
आजच्या जगात वापरल्या जाणाऱ्या सर्व तंत्रज्ञानाचा शोध पाश्चिमात्य देशातला, मग विज असो, अवजड यंत्र असोत कि माहिती तंत्रज्ञान, मोबाईल फोन. हे सर्व तिकडून आल्याने त्या भाषेतले शब्द मराठीत येणार हे उघड आहे. त्यासाठी नव-नविन शब्द योजले तर उत्तम पण त्यामुळे भाषेवर आक्रमण झाले वगैरे समज करून घेण्यात काही अर्थ नाही. कारण ‘योगाला’ ‘डिव्हाईन-जॉईन-स्ट्रेचेस’ असा शब्द मी कुठे पाहिला नाही, तो इंग्रजी (व इतर) भाषांनी आहे तसा स्विकारला. गुरू , अवतार, बुद्धा, मंत्रा, धान हे शब्द भारतीय भाषांमधून/संस्कृतीतून जशेच्या इंग्रजीमधे गेले, … हो पण एक नक्की आजच्या जगातल ज्ञान विज्ञान हे मूळातून मराठी भाषिकांनी मराठी भाषेत संशोधन करून निर्माण केलं नसल्याने , त्यातील शब्द आपल्या भाषेत आलेत, हे वास्तव स्विकारायला हवं
५. शिक्षण सम्राटांची धोरणं
विना अनुदान सुरू केलेल्या इंग्रजी शाळांमधे रग्गड पैसा मिळतो हे लक्षात आल्याने नियम #१ नुसार याची बेसुमार वाढ आहे. हेच होत असताना चांगल्या दर्जाच्या शाळा मराठी माध्यमातून सुरू करण्याकडे दुर्लक्ष.