पुणेरी पगडी :: प्लग लोगो – क्रिएटीव्हिटी आणि इतिहास

पुणेरी पगडी - प्लगचा लोगो

प्लगचा लोगो

रेडहॅट ७.२ हे पहिलं लिनक्स (माझ्यासाठी पहिलं) शिरीष सरांनी सासवडला माझ्या घरी येऊन मशिनवर टाकलं तेव्हा ते वापरताना मला आभळ ठेंगणं झालं होतं. त्यावेळी माझं जग डॉसचा काळापांढरा स्क्रीन आणि विन्डोज-९८ याभोवतीच रेंगाळत होतं. मिलेनियम आणि २००० ही चैन होती, गावात क्वचीत कुणाकडे तरी ती पहायला मिळायची. ( हो, विन्डोज मिलेनियम नावाची ओएस एके काळी होती बर का .. )

लिनक्स वापरायला सुरूवात केली त्यावेळी लिनक्स तयार करणारा लिनस टोर्वल्ड आणि त्याच्या ‘टक्सचा’ मी भलताच फॅन झालो होतो. डेस्कटॉप वर टक्स, स्क्रीनसेव्हर टक्स .. एकंदर पेग्विनच पेग्विन !

असाच दुपारी कॉम्प्युटरवर काहितरी करत बसलो होतो, कंटाळा आला म्हणून एक पेग्विन ओपन केला, गंमत म्हणून त्याच्या पांढर्‍या दिसणार्‍या पोटावर भगवा ॐ टाकला. एक पेग्विन आणि त्याच्या पोटावर ॐ, हे पाहून मागे बसलेल्या मंदार आणि आई दोघांच्याही नजरा स्क्रीनवर वळल्या आणि पुढचं एडीटींग सामुदायिक झालं म्हणजे मागून आवाज यायला लागले ..

” ए त्याला जाणवं घाल ..”
” मग आता डोक्यावर टिळक पगडी पण ठेव ..”
” अरे फेटा पण चांगला दिसल .. ”

- टिम ब्रेन स्टॉर्मिंग !

.ढेरिवर ॐ, गळ्यात जाणवं असा पेग्विन देखणा दिसत होता की विचारू नका, आणि शेवटी कळस केला पगडीने. नंतर पगडीवाला पेग्विन, ढेरीवर ॐ असलेला पेग्विन अशी दोन तीन वेगवेगळ्या चित्रांच्या फाईल व्यवस्थित तयार केल्या आणि त्या शिरीष सरांकडे ईमेलने गेल्या. त्यांच्याकडून त्या [बहुतेक शेखर जोशींमार्फत] प्लगच्या अधिकृत मेलिंग लिस्ट वर पोस्ट झाल्या. त्यानंतरच प्लगच्या स्वयंसेवकांनी [ बहुतेक झॉईड] याच ‘क्रिएटिव्ह कन्सेप्ट’ चा वापर करून ‘आर्टिस्टीकली करेक्ट इमेज’ तयार केली, की जी आज प्लगचा लोगो म्हणून वापरली जात आहे. .. खरचं विश्वास बसत नाही ना .. पुणे लिनक्स युजर ग्रुपच्या लोगोची कन्सेप्ट सासवडच्या एखाद्या पेशवीकालीन वाड्यात निर्माण झाली असेल .. टी-टाईममधे ! :)

ही पोस्ट आज कशी ?

सध्या एखादा लिनक्स लॅपटॉप घेण्याच्या विचारात असल्याने गुगलाई करताना प्लगच्या साईटवर येऊन थांबलो, तिथे लोगो संदर्भात ‘अबाउट अस’ मधे असलेली Note वाचली आणि सात-आठ वर्षांपूर्वी घडलेलं हे सगळ आठवलं, सुरूवातीला गंमत वाटली पण http://www.groklaw.net/article असल्या बातमीच्या पार्श्वभूमीवर एक प्रश्न निर्माण झाला, अर्थात याचं उत्तर मला नको असलं तरी प्लगने यावर विचार करावा एवढी माफक अपेक्षा आहे ..

  • योगदानासंबंधी नोंद :
    GNU / GPL खाली तयार झालेल्या प्रत्येक सॉफ्टवेअरमधे त्याच्या कॉन्ट्रीब्युटर्सची यादी असते, योगदानासंबंधी नोंद तिथे केलेली असते. या नोंदी इंटलेक्चुअल कॉन्ट्रीब्युटर्सच्या सन्मानार्थ तर असतातच परंतू त्याशिवाय त्यावर दुसर्‍या कोणी अधिकार सांगण्याचा प्रश्न त्यामुळे उद्भवत नाही. जर प्लग सारखीसंस्था GNU/GPL च्या विचारधारेवर चालत असेल तर या ‘इंटलेक्चुअल कॉन्ट्री’ ची नोंद त्यांनी एखाद्या ठिकाणी करून ठेवणं आवश्यक आहे की नाही ? जर असे नसेल तर Creative common, GNU/GPL आदी-आदी गोष्टींच्या भलावणीला काहीच अर्थच उरत नाही, हो ना ?
  • पुढचा प्रश्न उपस्थित होतो :
    अर्थात – प्रत्येक गोष्टीची नोंद करून ती वेबसाईटवर दाखवायची का ? याचं उत्तर ‘नाही’. परंतु लोगो, टायटल्स, ट्रेडमार्क आदी गोष्टी बौद्धिक अधिकाराखाली येतात, बदलत्या व्यावहारिक जगामधे याचं महत्व अनन्यसाधरनपणे वाढयत हे निश्चित आणि यासंदर्भात भविष्यात कधी कुठे प्रश्न उद्भवतील हे सांगता येत नाही, त्यामुळे वेळच्या वेळी नोंदी ठेवणं कधीही उत्तमच.
  • मूळ टक्स लोगो :
    यासंदर्भातली मूळ टक्सची माहिती असलेल्या पानावर : http://en.wikipedia.org/wiki/Tux – लोगो काढणारा, मूळ संकल्पना देणारा आणि त्याची पुनर्रचना करणारा अशी पूर्ण माहिती उपलब्ध आहे, जर अशी माहिती ‘इथे’ देता येऊ शकते तर ‘तिथे’ का नाही ?

आणि हो, डोक्यावर पुणेरी पगडी असलेला टक्स ‘आमचा’ म्हणून कुणीतरी खिशात घालण्यापूर्वी ही पोस्ट लिहिलेली बरी म्हणून आजच्या विकान्ताचा हा व्याप !!

जाता जाता : आमच्या पुणेरी पगडीच्या प्रेमाची साक्ष देण्यासाठी हे फोटो पुरेसे आहेत :

Traditional day