कळत-नकळत आज काळाने आपल्यालाही तिथंच आणून सोडलय. सकाळी झोपेतून उठवणाऱ्या आलार्म पासून ते रात्री झोप येण्यासाठी घेतलेल्या गोळ्यापर्यंत किंवा डास पळवण्यापर्यंत … आपल्या जगण्यावर, वागण्यावर, बोलण्यावर, विचारांवर, समाजमनावर आणि संस्कृतीवरदेखील राज्य आहे केवळ टेक्नॉलॉजीचं ! आम्ही ग्लोबल आयटी हब आहोत, हवी असलेली गॅजेटस् हाताशी आहेत, आमच्या सेलला 3G नेटवर्क आहे, शे-दिडशे टिव्ही चॅनेल्स मनोरंजनासाठी आहेत, आमच्याकडे स्ट्रॉग आणि मुक्त मिडिया आहे .. , मला हे सगळ चांगलं कि वाईट या प्रश्नात पडयच नाहीय पण एक नक्की आम्ही-एक-समाज, काल जिथे होतो तिथून कुठेतरी पुढे निश्चितच आलो आहोत यात काहीच शंका नाही.
पण हे सगळ होत असताना या ‘टर्निंग पॉईन्टला’ काप्रां आठवतात आणि प्रश्न पडतो आम्ही समाज म्हणून खरच सुखी आहोत का ? समाजचं मानसिक संतुलन काय आहे ? आम्ही जी संस्कृती जोपासतोय ती उन्नतीकडे घेऊन जाणारी आहे की अधोगतीकडे ? कारण ‘सो कॉल्ड’ या प्रगतीलादेखील दुसऱ्या बाजू आहेत ..सातबारा उतारे कॉम्युटरवर मिळतात पण ‘गांधीजीं’ शिवाय कॉम्प्युटर सुरू होत नाही, उपभोग्य वस्तू आहेत पण विज नाही. गावो-गाव नेटवर्क-कव्हरेज आहेत पण रस्ते, पिण्याचं पाणी, संडास नाहीत.. बौद्धिक संपदा आहे पण राजकारणाला त्यात स्वारस्य नाही.. आमचा सेन्सेक्स अप आहे पण शेतकरी आत्महत्या करतोय, आम्ही उत्कृष्ठ शिक्षण देतोय पण .. आमचे विद्यार्थी जगायला घाबरतायत .. या आणि अशा अनेक, पण शेवटचा मात्र मनाला हुरहूर लाऊन जातो, कारण त्यात उद्याची उज्वल आशा नाही, आहे केवळ स्मशान शांतता !
या आमच्या प्रगतीमधे आम्ही अनेक बुरूज कमावतोय तसंच अनेक गमावतोय आणि त्यापैकी एक म्हणजे संवाद ! आमचा एकमेकांमधील संवाद संपत चाललाय, त्याची जागा मृतवत ‘बोलण्याने’ घेतली आहे, कदाचित ‘व्यावसायिक बोलणं’ हा योग्य शब्द असेल. गेल्या महिनाभरातील घटनांवर विचार करताना त्या मुलांविषयी अनेक प्रश्न मनात आले, खरचं काय चाललं होतं त्यांच्या आतमधे ? कशाची भिती वाटत होती त्यांना ? पालकांशी संवादाने ते प्रश्न सुटले नसते का ? की पालकांचीच भिती मृत्युपेक्षा जास्त होती ? याच प्रश्नांचं स्वरूप आणखी गंभीर होतं जेव्हा त्यांच्या शाळा आणि शिक्षक यांचा विचार मनात येतो, मिडियाने दिलेल्या बातम्यांनुसार ही ‘विद्यार्थ्याची आत्महत्त्या’ होती, कुठेही ‘युवकाची किंवा कुमारांची’ हे शब्द दिसले नाहीत. आपल्या शिक्षणव्यवस्थेत शिकणारे विद्यार्थी जर आत्महत्या करत असतील तर शिक्षणव्यवस्थेवरच शंका येते आणि प्रश्न पडतो “आम्ही खरचं काय शिकवतोय त्यांना ?”
एकाच वेळी वर्गातल्या ६० मुलांकडे लक्ष देणं शिक्षकाला शक्य नाही हे मान्य आहे परंतु मुलांचं लक्ष्य आपल्याकडे येईल असा शिक्षक होणं हे तर शक्य आहे ना ? खरंच त्या शाळा-कॉलेजेसमधे असे एकही शिक्षक नव्हते, ज्यांच्याकडे त्या मुलांना विश्वासाने बोलता आलं नाही ? ज्यांच्याकडे बघून ‘जीवन काय भन्नाट आहे’ असं वाटलं नाही ? असतीलही ..पण संवाद साधणं कमी झालय, हो ना ? हे प्रश्न घेऊन ब्रेनस्टॉर्मिंग करताना मी शिक्षण-व्यवस्थेला किंवा त्या शिक्षकांना टार्गेट करत नाही तर हे टाळण्यासाठी संभाव्य आशास्थान म्हणून त्यांच्याकडे पहातो आहे. एकमेव आशास्थान ! इथे झालेल्या गोष्टींची चर्चा करून त्याचे दोषी कोण हे शोधण्याइतकादेखील वेळ नाही, कारण टायमर चालू झालेला आहे .. काळ पुढच्या कोणाचीतरी तयारी करतोय, आणि प्रत्येकासाठी पालक म्हणून एकच प्रश्न उरतो – तुमच्या मुलांच्या मनात काय चाललय ?
हे सगळं वाचत असताना नकळत मला माझ्या आयुष्यातील सुसाईड-पॉईन्टला जाण्याचे प्रसंग आठवले. सगळं अगदी नकोस वाटणं किंवा ‘आता आपलं सगळं संपलं’ या निर्णयाप्रत येणं ही कोणाच्याही आयुष्यातील स्वाभाविक गोष्ट आहे. पण असं वाटत असताना कोणाचे शब्द तुमच्या कानावर येतात, कोणते चेहरे समोर दिसतात आणि तुम्ही त्या क्षणी काय करता हेच सर्वात महत्वाचं ठरतं. आणि इथेच मदतीला आले माझे शिक्षक! अशा प्रत्येक प्रसंगामधे मला तोडकर सरांनी लिहिलेल्या एकमेव पत्राची आठवण होते मी शांतपणे ते वाचून काढतो आणि जगण पुन्हा सुरू होतं. एखादा हायस्कूल शिक्षक विद्यार्थ्याच्या मनावर, विचार-भावना विश्वावर किती परिणाम करू शकतो याचं हे ज्वलंत उदाहरण आहे, या पत्रातील माझं नाव सोडलं तर उरलेला मजकूर .प्रत्येकसाठी लागू होतो, म्हणूनच हे पत्र इथे [लिन्क : http://blog.guruvision.in/?p=36 ] देतोय, कदाचित यातून काही शिक्षक, विद्यार्थी प्रेरणा घेतील आणि पुढच्या अनेक आत्महत्त्या टाळता येतील.



ताण रहित मोफत प्रशिक्षण अशि एक चांगली संकल्पना आम्ही गेली ५-७ वर्ष राबवत आहोत. त्याचा अहवाल आपण या दुव्यावर वाचू शकाल.
http://savadhan.wordpress.com/2010/01/30/%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%9C%E0%A4%A4%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%AB%E0%A4%A4-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7/वाचून पहा. बघा पटतंय का?
[Reply]
Posted by purushottam
Link | March 6th, 2010 at 3:57 am