‘टिनएज’मधे वाचलेल्या पुस्तकांमधे मनावर भावनिक ठसा उमटवणारी जी पुस्तकं ठरली त्यापैकी एक म्हणजे हेलन केलरचं चरित्र. मूळ कॅथरिन पिअर्स यांनी लिहिलेल्या या चरित्राचा शांता शेळके यांनी मराठीत सुंदर अनुवाद केलाय. ‘हेलन केलर‘ यांचं सारं जीवनच भन्नाट होतं, त्यांच्या जगण्यातली जिद्द, लढा, तळमळ, एकाकीपणा, हु्रहूर या सगळ्या गोष्टी अतिषय प्रभावीपणे शांताताईंनी अनुवादित केल्या. पूर्णपणे अंध-बधीर असलेली हेलन प्रेम म्हणजे काय हे स्पर्श-खूणांनी विचारते आणि तिची शिक्षिका तिलाही त्याच भाषेत उत्तरं देते. हे लिहिलेले शब्द वाचतानाच पुन्हा पुन्हा मन मोहरून जातं, ज्यावेळी हे सर्व हेलनला सांगितलं गेलं असेल त्यावेली तिला कसं वाटलं असेल ? हा प्रश्न मनात रेंगाळत रहातो.
प्रेम म्हणजे काय ? प्रेम म्हणजे फुलांचा सुगंध का ? ऊन्हाची ऊब का ? माझी छाती धडधडते, ते धडधडणे म्हणजे प्रेम का ? मी त्याला स्पर्श का करू शकत नाही ?
हेलन, तू आभाळतल्या ढगांनाही स्पर्श करू शकत नाहीस, पण धगातून पडणारा पाऊस तूला जाणवतो. एखाद्या उकाड्याच्या दिवशी तर तापलेली जमीन कशी निवते, फुलं कशी उल्हासित होतात हेही तुला कळतं. प्रेमही तसंच आहे हेलन, ते तूला स्पर्शाने चाचपून पहाता येत नाही, पण ते वस्तूमात्रात जो आनंद, जे समाधान ओतीत असतं ते तूला सहज जाणवत, प्रेम नसेल तर तूझं सारं सुख हरपून जाईल, तुझा खेळकपणा नाहिसा होईल.
केलर यांच चरित्र इथेच संपत नाही, तुमच्या आमच्याप्रमाणेच त्याही एक माणूस होत्या. प्रचंड अपमान, घोर निराशा, अपयश या गोष्टी त्यांच्या आयुष्यात पुरेपूर भरून उरल्या होत्या अशा वेळी फेका-फेकी करणार्या हेलनला उत्तुंग बळ दिलं कधी तिच्या स्वत:च्याच शब्दांनी तर कधी तिच्या प्रिय टिचर ने !
तुझा देवावर विश्वास आहे, तुझा माणसाच्या कर्तुत्वावर विश्वास आहे आणि आत्म्याच्या अमर सामर्थ्यावरही तुझी श्रद्धा आहे. खरं ना ? तूच तर एके काळि हे लिहून ठेवलं आहेस. आजही तुझी या सर्व गोष्टींवर पूर्वीइतकीच अधळ श्रद्धा आहे ना ? मग झालं तर, या पुढेही तशीच श्रद्धा ठेवून तुला पुन्हा एकदा उभारिनं कामाला लागलं पाहिजे.
आंधळी हे पुस्तक वाचताना एखाद्याचे डोळे ओले होतील, एखाद्याचे डोळे उघडतील, एखाद्याला शांताताईच्या अनुवादशैलीची सिद्धहस्तता जाणवेल , पण अनुभवाचा एक धागा प्रेत्येकासाठी सारखा असेल तो म्हणजे ‘ जगण्याची प्रेरणा’ !
काळोख आणि निशब्दता हे कितीही मोठे अडथळे असले तरी आत्म्याच्या प्रगतीला त्यांच्यामुळे बाधा येण्याची काही कारण नाही !
* अवतरणातील उतारे मूळ पुस्तकातील आहेत.

